गंगापूर : हेवा वाटेल असा चारित्र्यसंपन्न बलशाली समाज आपल्याला घडवावा लागेल. त्यासाठी आपला स्वभाव आणि आचरण तसे करावे लागेल. भारताच्या भविष्यासाठी हिंदू समाजच जबाबदार आहे. त्यासाठी हिंदू समाजाने स्वतःच्या आचरणातून समाज परिवर्तन घडवून आणावे, असे आवाहन डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी गंगापूर येथे केले.
हिंदू धर्म, परंपरा संस्कृती आणि मूल्यांचे संरक्षण व संवर्धन या उद्देशाने हिंदू संमेलन समिती गंगापूर यांच्या वतीने गंगापूर येथे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला संबोधित करताना डॉ. भागवत बोलत होते. हे संमेलन गंगापूर येथील जि. प. प्रा. शाळा मैदान, गंगापूर येथे हजारो हिंदू बंधू भगिनी व संतांच्या उपस्थितीत पार पडले. या संमेलनास ह.भ.प. भास्करगिरी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान), ह.भ.प. महंत रामगिरी महाराज (मठाधिपती, गोवर्धन धाम, श्री क्षेत्र सरलाबेट), जगद्गुरु श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरी महाराज (जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी आश्रम, श्री क्षेत्र वेरूळ) यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील छत्रे यांनी केले. त्यांनी या संमेलनाची पार्श्वभूमी मांडली. आणि पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमात उपस्थित संतांनी आशिर्वचन करताना समाजाला समरसता व कुटुंब प्रबोधनासाठी मार्गदर्शन केले. भास्करगिरीजी महाराजांनी “संघाने मान अपमान सहन करत शंभर वर्षाचा प्रवास केला आहे. जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजाचे त्यांनी संघटन केलं. आता हिंदू समाजाने सामाजिक एकोपा ठेवून वाटचाल करावी असे आवाहन केले. रामगिरीजी महाराजांनी बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष वेधले. ते म्हणाले आपल्याला संघटित रहावे लागेल. आपल्या समाजातील जातीवादाचे समूळ उच्चाटन करावे लागेल. त्यानंतर शांतीगिरीजी महाराजांनी समाजाने आपल्या संस्कृतीचे आचरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विदेशी संस्कृतीच्या आहारी गेल्यामुळे आपली पिढी चुकीच्या मार्गाला जात आहे. आपले कुटुंब सुसंस्कृत करा, ज्यामुळे आपला समाज सुरक्षित होईल. असे ते म्हणाले. गाथामूर्ती रामभाऊजी महाराज यांनी लिखित स्वरूपात आशिर्वचन संदेश पाठवला. या कार्यक्रमाचा उद्देश सफल करून समाजाने येथील संत संदेश आचरणात आणावा असे त्यांनी सांगितले.
सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले, आपल्याला समाज परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. समानता आपल्याला केवळ ओठात नको कृतीत हवी आहे. त्यासाठी सगळ्या जातीपातीतील आपले मित्र केले पाहिजे. समाजात सद्भावना असायला हवी. कुटुंबात आपल्या संस्कार, परंपरांची चर्चा करायला हवी. आपल्या जगणे जगताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी केली पाहिजे. विदेशी वस्तूंचा वापर करण्यापेक्षा स्वदेशीला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे. आपण आत्मनिर्भर झालो तर आपल्या शक्तीला अर्थ राहील. ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणल्या तर आपला समाज बलशाली होईल, असे ते म्हणाले.
