छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर भाजपची सत्ता ; तब्बल 58 जागांवर विजय; एमआयएम दोन नंबरचा पक्ष; शिवसेनेच्या दोन्ही गटांना दणका

छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी

शिवसेनेच्या शिंदे गटाशी फारकत घेऊन स्वतंत्रपणे महापालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने अखेर छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर सत्ता मिळवली आहे. पक्षाचे शहरात तब्बल 58 उमेदवार निवडून आले असून, 33 जागा जिंकणारा एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांची पुरती वाताहत झाली असून, शिंदे गटाला अवघ्या १२ तर ठाकरे गटाला 10 जागा मिळू शकल्या. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली असून, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला भोपळाही फोडता येऊ शकला नाही. वंचित बहुजन आघाडीने मात्र चांगली कामगिरी करत चार उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवले आहे.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा शिंदे गट हे दोन पक्ष यंदाच्या महापालिका निवडणुकीत एकत्र लढतील अशी शक्यता होती. मात्र राज्य मंत्रिमंडळातील सहकारी असलेल्या अतुल सावे व संजय शिरसाट यांनी वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लावल्याने या दोन्ही पक्षांची युती होऊ शकली नाही. अखेर जागावाटपाबाबत एकमत न झाल्याने अखेर हे दोन्ही पक्ष या निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे गेले. त्यात भाजपने बाजी मारत बहुमताला आवश्यक असलेल्या 58 जागा निवडून आणण्यात यश मिळवले आहे. एमआयएमने 33 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्यात यश प्राप्त केले. आता महापालिकेत भक्कम विरोधी पक्ष म्हणून एमआयएमचे नगरसेवक दिसतील. विशेष म्हणजे 9 वर्षांपूर्वी 25 जागा जिंकणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकांची संख्या यंदा आठने वाढली आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, मंत्री संजय शिरसाठ यांचे पुत्र सिद्धांत व कन्या हर्षदा, आमदार प्रदीप जयस्वाल यांचे चिरंजीव ऋषिकेश जयस्वाल, माजी उपमहापौर विजय औताडे, रेणुकादास उर्फ राजू वैद्य, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे, माजी महापौर रशीद मामू हे यंदाच्या निवडणुकीतील विजयी झालेले प्रमुख चेहरे आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून किल्ला लढवणारे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांना मात्र या निवडणुकीत सपशेल पराभवाचा सामना करावा लागला.

शासकीय तंत्रनिकेतन, गरवारे स्टेडियम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सेंट फ्रान्सिस हायस्कूल या चार केंद्रांवर शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला ही मतमोजणी अत्यंत संथगतीने असल्याने प्रत्यक्ष निकाल हाती यायला संध्याकाळचे साडेपाच वाजले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *