निवडणुकीत खर्च केला, पण हिशेब देईनात; फुलंब्रीत 26 उमेदवारांना नोटीस!

फुलंब्री / प्रतिनिधी

नगरपंचायतीची निवडणूक लढवितांना केलेल्या खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या फुलंब्रीतील 26 उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अखेर अंतिम नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्चाचा विषय वेळेत सादर न केल्यास या सर्वांवर निवडणूक कायद्यानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबरला पार पडली. या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 54 उमेदवारांनी नशीब आजमावले. नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या तिघांपैकी दोन उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. मात्र एका उमेदवाराने अद्यापही हा हिशेब दिलेला नाही. त्याचवेळी नगरसेवक पदासाठी निवडणुकीत झुंज दिलेल्या 54 पैकी पराभूत झालेल्या 26 उमेदवारांनी देखील अद्याप आपल्या खर्चाचा हिशेब सादर केलेला नाही.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीच्या निकालानंतर तीस दिवसांच्या आत आपल्या निवडणूक खर्चाचा तपशील सादर करणे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बंधनकारक आहे. असे असताना या 26 उमेदवारांनी या नियमाचे पालन केलेले नाही. त्यामुळे त्यांना या आधीच दोन वेळा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही त्यांनी ही शेफ सादर न केल्याने अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना दोन दिवसांपूर्वी अंतिम नोटीस बजावली.

*अपात्र ठरविण्याची तरतूद*

निवडणूक खर्चाचा हिशेब ठराविक मुदतीत सादर न केल्यास संबंधित उमेदवारांना पुढील निवडणुका लढविण्यासाठी अपात्र ठरविण्याची तरतूद निवडणूक कायद्यामध्ये आहे. फुलंब्रीतील 26 उमेदवारांनी या अंतिम नोटिशीनंतर देखील हिशेब सादर न केल्यास त्यांच्यावरही ही कारवाई होऊ शकते. दरम्यान आता आपल्या निवडणूक खर्चाचा हिशेब न देणाऱ्या 26 उमेदवारांबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती फुलंब्रीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *