छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्यानंतर बँक खात्यात अग्रीम रक्कम जमा होऊनही घरकुलाचे बांधकाम न सुरू करणाऱ्या लाभार्थ्यांना अखेर पंचायत समिती प्रशासनाने नोटीसा बजावले आहेत. यामुळे या लाभार्थ्यांचे धाबे दणाणले आहे.
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गोलटगावात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2025 – 26 या वर्षात 402 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 360 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पंचायत समिती कार्यालयाने प्रथम अग्रीम म्हणून प्रत्येकी 15 हजार रुपयांची रक्कम जमा केली आहे. हे पैसे जमा झाल्यानंतर घरकुलाचे बांधकाम लाभार्थ्यांनी तातडीने सुरू करणे अपेक्षित असते. मात्र पैसे जमा होऊन तीन महिने उलटल्यानंतरही 289 लाभार्थ्यांनी अद्यापही घरकुलांचे बांधकाम सुरू केलेले नाही. केवळ 71 लाभार्थ्यांचेच घरकुलाचे बांधकाम सुरू झाले आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना रावताळे यांनी तातडीने बैठक घेऊन घरकुलाचे बांधकाम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांना तत्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिले. यानंतर घरकुल विभागाचे कामकाज पाहणारे अभियंता विजय जिवरग, ग्रामपंचायत अधिकारी केशव सूर्यवंशी सरपंच सचिन लाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू न करणाऱ्या गोलद गावातील लाभार्थ्यांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे.
