शिंदेसेनेत नेते तुपाशी, कार्यकर्ते उपाशी; 95 पैकी 82 उमेदवार पराभूत!

छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी

स्वबळावर महापालिका निवडणूक लढवून स्वतःची वेगळी ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेची (शिंदे गट) या निवडणुकीत नेते जिंकले कार्यकर्ते पडले अशी अवस्था झाली आहे. 95 जागा लढणाऱ्या या पक्षाचे फक्त 13 उमेदवार जिंकले असून, तब्बल 82 उमेदवारांच्या पदरी पराभव आला आहे.
भाजपशी फारकत घेऊन शिंदे सेना महापालिका निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे गेली. मात्र पक्षाचे नेते आणि पदाधिकारी एका बाजूला तर निवडणूक रिंगणात उतरलेले कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला अशी अवस्था निवडणूक काळात दिसून आली. आपणच तिकीट दिलेल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी आपण, आपली मुले किंवा नातेवाईक कसे निवडून येतील याकडेच जास्त लक्ष घातले. इतर कार्यकर्ते निवडून येण्याच्या दृष्टीने त्यांनी लक्षच दिले नसल्याचे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. तूर्तास शहरात शिंदे सेनेचे सर्वेसर्वा असलेले पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी प्रभाग क्रमांक 29 मधून मुलगा सिद्धांत याला तर प्रभाग क्रमांक 18 मधून कन्या हर्षदा दिला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. स्वतः शिरसाट यांनी इतर उमेदवारांना वाऱ्यावर सोडून या दोघांना निवडून आणण्यासाठीच वेळ खर्ची घातला. परिणामी हे दोघे विजयी झाले. दुसरीकडे माझी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी माजी महापौर अनिता घोडेले याही विजयी झाल्या. याशिवाय आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषिकेश जैस्वाल, माझी महापौर त्रंबक तुपे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ हे नेते व पदाधिकारी देखील आपापल्या प्रभागातून विजयी झाले. या सर्व नेते व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांच्या प्रभागामध्ये प्रचारासाठी वेळच दिला नाही. परिणामी शहरातील बहुतांश प्रभागातून शिंदे सेनेचे चांगले कार्यकर्ते पराभूत झाले. एकंदरीत पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांचे नातलग किंवा ते स्वतः जिंकले, मात्र कार्यकर्ते पराभूत झाले, अशी अवस्था शिंदे सेनेची झाली असून, पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्यानेच ही अवस्था झाल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *