छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळताच एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उद्दामपणा समोर आला आहे. निवडणुकीतील यशानंतर या पक्षाच्या आयोजित विजय बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर चक्क नोटांची उधळण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पक्षाचे आणि एकंदरीतच छत्रपती संभाजीनगरमधील राजकारण भविष्यात कोणत्या दिशेला जाणार, याचेच दर्शन या निमित्ताने झाले अशी चर्चा सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक 57 उमेदवार निवडून आले. यामुळे या पक्षाने प्रथम क्रमांक पटकावला. तर हैदराबाद येथे स्थापन झालेल्या एमआयएम पक्षाने मनपा निवडणूकीत 33 नगरसेवक निवडून आणत द्वितीय क्रमांक पटकावला. गतवेळीच्या तुलनेत एमआयएमचे यंदा आठ नगरसेवक वाढल्याने साहजिकच या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र या उत्साहाच्या भरात या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उद्दामपणा घडत असल्याचे चित्र नुकतेच समोर आले.
महापालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर एमआयएमच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांसह बैठकीचे आणि जल्लोष पार्टीचे आयोजन केले होते. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि या निवडणुकीची संपूर्ण धुरा सांभाळणारे माजी खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित होते. साग्रसंगीत असलेल्या या जल्लोष पार्टीत जोरदार नाचगाणेही झाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी नृत्यही केले. मात्र या जल्लोषात एका पदाधिकाऱ्याने नाच करताना चक्क जलील यांच्यावर नोटांची उधळणही केली.
पक्षाच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर नोटांची उधळण झाल्याने आता एमआयएम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्वतः जलील यांनी असा प्रकार घडल्याचे मान्य करताना त्या नोटा मात्र बनावट असल्याचा खुलासा केला आहे. असे असले तरी यानिमित्ताने एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उन्माद समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे
