छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी
महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सातव्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक 57 नगरसेवक निवडून येणे हेच असे पहिल्यांदाच घडले आहे तसेच आणखी एक वेगळी उठून दिसणारी बाबही घडली आहे. आता महापालिकेच्या सभागृहात पहिल्यांदाच निवडून आलेले तब्बल 67 नवखे नगरसेवक दिसणार आहेत.
निवडणूक कोणतीही असली तरी प्रत्येक पक्ष निवडून येण्याच्या सक्षमतेवर कोणालाही उमेदवारी देत असतो. यंदा महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांमधील ही क्षमता शोधून नवीन कार्यकर्त्यांना महापालिकेत संधी दिली. या नवख्या उमेदवारांनी ही आपली सक्षमता सिद्ध केल्याचे या निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले. यंदा भाजप बहुमताच्या जवळ असल्याने महापालिकेतील सर्व महत्त्वाची पदे त्यांच्याकडे असतील. त्यातही या पक्षाचे 32 नगरसेवक अनुभवी तर 26 नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
या पाठोपाठ एमआयएम या पक्षाने देखील सर्वाधिक नवख्या चेहऱ्यांना उमेदवारीची संधी दिली होती. पक्षाची ही खेळी यशस्वी झाली असून या पक्षाचे देखील आता 26 नवे तर सात अनुभवी चेहरे महापालिकेत दिसणार आहेत. याशिवाय शिंदे सेनेचे आठ, उद्धव सेनेचे चार, वंचित बहुजन आघाडीचे दोन तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा एक असे एकूण 67 जन पहिल्यांदाच निवडून आलेले उमेदवार ठरले आहेत. दुसरीकडे अनुभवी नगरसेवकांच्या यादीत भाजपचे 32, एमआयएमचे 7, शिंदे सेनेचे 4, उद्धवसेनेचे 2, वंचितचे 2 आणि काँग्रेसचा एक अशा 48 जणांचा समावेश आहे.
