गिरीश महाजनच्या वक्तव्याचा महागावात जोडे मारो आंदोलन केला निषेध
महागांव येथे आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप करत, महागाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अंकुश कोकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
बूट आणि चपलांनी फोटो बदडला
महागाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. महाजन यांनी महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत महाजन यांचा तीव्र निषेध केला.
तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन
आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी महागाव तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा: गिरीश महाजन यांनी जाणूनबुजून महापुरुषांचे नाव टाळून भावना दुखावल्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा.
पदावरून बडतर्फ करा: महापुरुषांचा अवमान करणाऱ्या मंत्र्याला तातडीने मंत्रीपदावरून बडतर्फ करण्यात यावे.
”ज्या घटनेमुळे देशाला ओळख मिळाली, त्या घटनेच्या शिल्पकाराचे नाव प्रजासत्ताक दिनी न घेणे हा महाराष्ट्राचा आणि संविधानाचा अपमान आहे. जोपर्यंत महाजन यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असे मत तालुकाध्यक्ष अंकुश कोकरे यांनी व्यक्त केले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी,जिल्हा महासचिव रामराव कांबळे,वंदनाताई भवरे,महाला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा
शहर अध्यक्ष पप्पु कावळे,निलेश रणविर राजु नरवाडे, सयाजी कांबळे, रितेश लांडगे,मनिष राउत, प्रफुल्ल हनवते, महेश भालेराव, नामदेव लहाने,अमोल कांबळे,रामराव शिकारे,गौतम गायकवाड, देवराव हरणे,बापुराव हगवणे,व असंख्य कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले
प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ
