शेंदुर्णीत दारू दुकानास ‘ना हरकत’ न देण्याची शिवसेनेची ठाम मागणी
शेंदुर्णी (ता. जामनेर) : प्रतिनिधी – राहुल चौधरी
पर्यटन व धार्मिक क्षेत्रात समाविष्ट असलेल्या शेंदुर्णी शहरात नवीन दारू विक्री दुकानास “ना हरकत दाखला” देऊ नये, अशी ठाम मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना शेंदुर्णी शहरप्रमुख तथा नगरसेवक भैया भाऊ गुजर यांनी शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या सभेमध्ये नवीन दारू विक्री दुकानासाठी “ना हरकत दाखला” देण्याबाबत अर्ज सादर होऊन त्यास मंजुरी दिल्याचे निदर्शनास आले. मात्र शेंदुर्णी शहर हे “प्रति पंढरपूर नगरी” म्हणून ओळखले जाते तसेच शासनाच्या पर्यटन व धार्मिक क्षेत्रांच्या यादीत समाविष्ट आहे. अशा पवित्र व धार्मिक वातावरण असलेल्या शहरात दारू विक्रीस परवानगी देणे हे शहराच्या सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक मूल्यांना बाधा पोहोचवणारे असल्याचे शिवसेनेने नमूद केले आहे.
शिवसेना ही समाजहित, संस्कृतीचे रक्षण व जनभावनांचा आदर करणारी संघटना असून शेंदुर्णी शहराची पवित्रता अबाधित राहावी, यासाठी दारू विक्रीसाठी कोणतेही “ना हरकत दाखले” देऊ नयेत, अशी ठाम भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.
सदर निर्णय तात्काळ रद्द करून शहरातील धार्मिक व पवित्र वातावरण कायम ठेवावे, अशी नम्र पण ठाम मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा शिवसेना, शिवसैनिक व शेंदुर्णीतील जागरूक नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.
