सुलतानपूर येथील सुभान मुसा शेख त्यांच्या पत्नी पवित्र उमरा यात्रेसाठी भावनिक निरोप समारंभात रवाना
सुलतानपूर येथील सुभान मुसा शेख व त्यांच्या पत्नी जमशिदाबी सुभान शेख हे पवित्र उमरा यात्रेसाठी दि. ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता सऊदी अरबातील मक्का व मदीना येथे रवाना झाले. या पवित्र यात्रेच्या निमित्ताने सुलतानपूर परिसरात भक्तिभावाने ओथंबलेले व भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
या वेळी सुलतानपूर येथील रहिवासी, नातेवाईक, शेजारी तसेच लोकमतचे पत्रकार राजू पठाण, लोणार–मेहकर मतदारसंघातील आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, विदर्भ कन्या शाहीन पटेल, श्री. दिलीप वाघ, श्री. सदानंद पाटील तेजनकर, सुलतानपूरचे उपसरपंच नागवंशी संगपाल पनाड, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संध्याकाळच्या शांत वातावरणात धार्मिक भावनांनी ओथंबलेला हा निरोप समारंभ मन हेलावून टाकणारा ठरला. उपस्थित नागरिकांनी शेख दाम्पत्यांना पुष्पगुच्छ, शाल व फुलांचे हार टाकत, दुआ करत व आपुलकीने मिठी मारत पवित्र यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळताना दिसत होते. “अल्लाह तुमचा प्रवास सुरक्षित करो आणि तुमची उमरा कबूल करो,” अशा शब्दांत सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सुभान शेख यांनी उपस्थितांचे आभार मानत भावना व्यक्त केल्या. “परिवारासह उमरा करण्याचा सौभाग्य लाभतो आहे, ही अल्लाहची मोठी नेमत आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमामुळे मन अधिक भारावून गेले आहे. सर्वांसाठी मक्का-मदीनामध्ये दुआ करणार आहोत,” असे ते भावूक स्वरात म्हणाले.
या पवित्र यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण सुलतानपूरमध्ये भक्तिभावाचे व सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी सुभान शेख दांपत्याच्या सुरक्षित, सुखरूप व यशस्वी उमरा यात्रेसाठी मनापासून दुआ केल्या.
प्रतिनिधी – साहिल खान
उपसंपादक बुलढाणा जिल्हा
