जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रावर घाणीचे साम्राज्य याला जबाबदार कोण?

जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रावर घाणीचे साम्राज्य याला जबाबदार कोण?

 

 प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ 

 

महागाव (विरुगुळा केंद्र) येथील जेष्ठ नागरिक मंडळाची अवस्था आज केवळ दुर्लक्षाची नाही, तर ती नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा कारभाराची साक्ष देणारी आहे. ही जागा पूर्वी महागावची ग्रामपंचायत कार्यालय होती. नगरपंचायत दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर, याच जागेवर जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले. उद्देश स्पष्ट होता जेष्ठ मंडळींसाठी शांत, सुरक्षित आणि सन्मानाची जागा उपलब्ध करून देणे.

मात्र आज वास्तव वेगळेच चित्र दाखवत आहे. चारही बाजूंनी साचलेला कचरा, प्लास्टिकचा ढिगारा, वाढलेली झुडपे आणि दुर्गंधी यामुळे हे विरंगुळा केंद्र आज घाणीच्या साम्राज्यात अडकले आहे. ज्या ठिकाणी जेष्ठ नागरिक बसून वेळ घालवायचे, विचारांची देवाणघेवाण करायचे, ती जागा आज आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक बनली आहे.

या परिस्थितीत नगरपंचायतीचे आरोग्य अधिकारी नेमके काय करत आहेत? डास, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याचा धोका असताना कोणतीही प्रतिबंधक कारवाई का होत नाही? स्वच्छतेच्या नावाखाली फक्त कागदोपत्री अहवाल तयार होतात की प्रत्यक्ष कृतीही होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याचबरोबर संबंधित प्रभागाचे नगरसेवक या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहेत? मतदारांच्या समस्या मांडणे आणि प्रशासनावर दबाव टाकणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असताना, जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत हे मौन का?शहराच्या कारभाराची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या नगराध्यक्षांनीही अद्याप या गंभीर विषयाची दखल घेतलेली नाही. नगरपंचायत कार्यालयातून विरंगुळा केंद्रात रूपांतरित झालेल्या या जागेची देखभाल ही थेट नगरपंचायतीची जबाबदारी असताना, ती बेवारस अवस्थेत का सोडली गेली आहे?

विशेष म्हणजे, नागरिकांकडून या जागेवर वाचनालय सुरू करावे, अशी सकारात्मक मागणी सातत्याने होत आहे. जेष्ठ नागरिकांसाठी सन्मानाचे, तर तरुणांसाठी अभ्यासाचे केंद्र उभे राहू शकते. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही मागणी केवळ कागदावरच अडकून आहे.

आता प्रश्न साधा आहे

नगरपंचायत कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर उभारलेले विरंगुळा केंद्रही जर घाणीच्या विळख्यात सापडत असेल, तर शहराच्या सार्वजनिक जागांची देखभाल कोण करणार?

तत्काळ स्वच्छता, नियमित देखभाल आणि वाचनालयासारख्या उपक्रमांची अंमलबजावणी झाली नाही, तर ही जागा केवळ जेष्ठ नागरिकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *