कामगारांच्या हक्कांवर गदा??
सही-शिक्क्यासाठी कर वसुलीची सक्ती थांबवा
प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ
महागांव नगरपंचायत हद्दीतील बांधकाम कामगारांना शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेला मुख्याधिकाऱ्यांचा सही-शिक्का मिळविताना प्रलंबित कर भरण्याची सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप. सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार लखन लोंढे यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी, नगरपंचायत महागांव यांना लेखी निवेदन सादर करून सक्तीची कर वसुली तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कर वसुली ही स्वतंत्र प्रशासकीय प्रक्रिया असताना शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सही-शिक्का देताना कर भरण्याची अट लावणे अन्यायकारक असून, हे कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या बांधकाम कामगारांना अशा प्रकारे अटी घालून त्रास देणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकारामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधितांना सक्ती न करण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही न केल्यास संबंधित कामगारांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही लोंढे यांनी दिला आहे.
नगरपंचायतीच्या या भूमिकेबाबत प्रशासन काय निर्णय घेतील याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. सामाजिक कार्यकर्ता लखन लोंढे यांनी मुख्य अधिकारीयाला दिले निवेदन
