- *जिओ नेटवर्क ठप्प; सुलतानपूर येथील ग्राहक त्रस्त*
सुलतानपूर (ता. लोणार) परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून Reliance Jio चे मोबाईल नेटवर्क वारंवार खंडित होत असून अनेक भागांत पूर्णपणे बंद पडले आहे. जिओच्या टॉवरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग, शासकीय सेवा, बँकिंग व्यवहार तसेच व्यापाऱ्यांचे डिजिटल व्यवहार ठप्प झाले आहेत.
सध्याच्या दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट सेवा अत्यावश्यक बनली आहे. शासकीय योजना, ऑनलाईन व्यवहार, बँकिंग सेवा, शैक्षणिक उपक्रम तसेच शेतीसंबंधी माहिती मिळवण्यासाठी नागरिक इंटरनेटवर अवलंबून असतात. मात्र जिओचे नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन पेमेंट, यूपीआय व्यवहार, शाळा–महाविद्यालयांचे ऑनलाईन वर्ग तसेच विविध शासकीय संकेतस्थळांवरील कामकाज ठप्प झाले आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, नेटवर्कअभावी डिजिटल व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत असून अनेकांना पर्यायी नेटवर्कचा आधार घ्यावा लागत आहे. काही ठिकाणी कॉल लागत नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे कठीण झाले आहे.
जिओ कंपनीने तात्काळ दखल घेऊन नेटवर्क सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच प्रशासनानेही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित कंपनीला तातडीने दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
*प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर*
