महागांव नगरपंचायतीत काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडीसाठी व्हीप जारी

महागांव नगरपंचायतीत काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडीसाठी व्हीप जारी

 

महागांव : महागाव नगरपंचायतीत २७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडीच्या विशेष सभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षादेश (व्हीप) जारी करण्यात आला आहे. काँग्रेसचे गटनेते श्री. शैलेशकुमार दिलीपराव सुरोशे यांनी दिनांक २ ६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा व्हीप काढला आहे.

नगराध्यक्ष निवडीसंदर्भात नगरपंचायत कार्यालयात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत मतदान होणार आहे. सदर विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी सभेला अनिवार्य उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांच्या आदेशानुसार महागाव नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. रुपाली संतोष कोल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे. सभेदरम्यान सौ. कोल्हेकर यांच्या बाजूने हात उंच करून मतदान करण्याचे स्पष्ट निर्देश व्हीपमध्ये नमूद करण्यात आले आहेत.

तसेच कोणत्याही परिस्थितीत पक्षाच्या निर्देशाविरुद्ध मतदान करू नये किंवा अनुपस्थित राहू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्या सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ अन्वये कारवाई करून अपात्र ठरविण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या घडामोडींमुळे नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महागाव नगरपंचायतीतील राजकीय हालचालींना वेग आला असून सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *