आठवणीतील एक दिवस..!*

आठवणीतील एक दिवस..!*

 

*३१ ऑक्टोबर २०२५* मध्ये *इंडिया सिक्युरिटी प्रेस* मधील कामगार संघटनेचे सरचिटणीस आणि माझे अतिशय जवळचे मित्र… *श्री. जगदीशजी गोडसे* हे त्यांच्या काही सहकाऱ्या बरोबर त्यांच्या नोट प्रेस संदर्भातील अतिशय महत्वाच्या कामाकरीता ममता हॉस्पिटलला मला भेटण्यासाठी आले.आणि त्यांनी नोट प्रेसच्या त्या महत्वाच्या कामाचा सारांश माझ्या कडे मांडला, आणि हा प्रश्न फक्त अजितदादाच मार्गी लावू शकतात असं ते माझ्याकडे बोलले. मी त्यांना दादांची वेळ घेऊन तुम्हाला कळवतो असं सांगून आश्वासित केलं.

दुसऱ्या दिवशी मी माझे सहकारी मित्र *श्री. अर्जुनभाईला* हा सर्व किस्सा सांगितला आणि आम्ही त्याच दिवशी अजितदादाशी संपर्क करून भेटण्याची वेळ मागितली. दादांनी आम्हांला *दि. ६ नोव्हेंबरची* सकाळी ११ ची वेळ दिली.आम्ही ताबडतोब हा निरोप आमचे मित्र *श्री. जगदीशजी गोडसे* यांना दिला आणि त्यांनी पण त्या कामासंदर्भात त्यांच्या *युनियन ऑफीस* मध्ये सर्व कामगार प्रतिनिधीची बैठक लावून *दि. ६ नोव्हेंबरला* मुबंईला जाण्याचा आदेश दिला. विशेष म्हणजे आमचा त्या बैठकीशी काडीचाही संबंध नसताना आम्हांला सुद्धा त्या बैठकीला निमंत्रित केलं. आणि आम्हां दोघांचा शाल आणि पुष्पगुछ देऊन सत्कार सुद्धा केला.

ठरल्याप्रमाणे आम्ही ६ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता नाशिकहून मुबंईकडे निघालो. आम्हांला *वरळी डोम* येथे बोलावलेलं होतं. *मी आणि अर्जुनभाई* एका गाडीत होतो. आणि नोट प्रेस मधील १०० कामगार प्रतिनिधी *श्री. जगदीशजी गोडसे आणि कार्याध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर जुन्द्रे* यांच्या नेतृ्वाखाली त्यांच्या त्यांच्या गाड्यामध्ये निघालो.

सकाळी ११ वाजता आम्ही वरळी डोम येथील कार्यालयात पोहोचलो. तिथे गेल्याबरोबर आम्हांला सर्वाना नाश्ता आणि चहा पाणी दिला. त्यानंतर अजितदादा साधारण १५ मिनीटांनी त्या कार्यालयात आले. सर्व कामगार प्रतिनिधीनी त्यांच्या संघटनेच्या शिस्तीप्रमाणाने डोक्यावर भगवी टोपी परिधान केलेली होती. *अजितदादा तसेच आमदार अनिल पाटील, श्री. शिवाजीराव गर्जे, अर्जुनभाई आणि मी* असे आम्ही व्यासपीठावर बसलो. आणि सर्व कामगार प्रतिनिधी समोर बसलेले होते. या सर्वांचे मुख्य प्रतिनिधी म्हणून मा. *श्री.जगदीशजी गोडसे आणि उपाध्यक्ष श्री. राजाभाऊ टाकेकर* यांनी अजितदादाना नोट प्रेस मधील त्या महत्वाच्या प्रश्ना संदर्भात सर्व माहिती दिली. ( प्रश्न अती गोपनीय असल्यामुळे त्या विषयी मी खोलात काही बोलू शकत नाही ). दादांसुद्धा त्या प्रश्नासंदर्भात सिरीयस झाले आणि *श्री. जगदीशजी गोडसे, श्री.ज्ञानेश्वरजी जुन्द्रे, श्री. राजाभाऊ टाकेकर,* तसेच *श्री. रामभाऊ जगताप* आणि त्यांच्या सर्व कामगार प्रतिनिधीना हा प्रश्न *केंद्रीय गृहमंत्री मा. ना. अमितजी शहा* यांना प्रत्यक्ष भेटून मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं.

 

त्या नंतर *अजितदादानी* केंद्र सरकारशी कागदोपत्री व्यवहार करून फेब्रुवारी महिण्यात केंद्रीय मंत्री *अमितजी शहा* यांची वेळ पण घेतलेली होती. परंतु इथे सुद्धा सर्व कामगारांचं दुर्दैव आड आलं आणि अजितदादा हा प्रश्न आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं पूर्ण ओझं आपल्या छातीवर घेऊन २८ जानेवारीला सर्व कामगारांना अलविदा करून निघून गेले ते परत न येण्यासाठी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *