*स्मार्ट मीटर मुळे वीजपुरवठा खंडित सुलतानपूर येथील दहा-पंधरा घरांना फटका*
महावितरण कंपनीकडून बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सुलतानपूर गावातील सुमारे १० ते १५ घरांचा वीजपुरवठा बंद झाल्याची घटना समोर आली असून, वेळेत वीज बिल न भरल्यामुळे ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. महावितरणकडून गावात नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून, या मीटरद्वारे वीज वापराचे अचूक रीडिंग घेतले जात आहे व त्यानुसारच ग्राहकांना वीज बिल दिले जात आहे. मात्र, बिलाची अंतिम तारीख संपल्यानंतर स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा आपोआप बंद होत असल्याने वेळेत बिल न भरलेल्या ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे.
गावातील सुमारे १० ते १५ घरांनी वेळेत वीज बिल न भरल्यामुळे त्यांच्या घरातील वीज अचानक बंद झाली असून, त्यामुळे संबंधित कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे सध्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून
वेळेत बिल न भरल्याने नागरिक अंधारात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल
परीक्षेची तयारी करतात, मात्र वीजपुरवठा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात बसून अभ्यास करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांना मेणबत्ती किंवा मोबाईलच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत असून, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत तसेच डोळ्यांवर ताण येत आहे. परीक्षेच्या काळातच वीजपुरवठा बंद झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, महावितरण विभागाने ग्रामीण भागात स्मार्ट
मीटरबाबत अधिक जनजागृती करावी व नागरिकांना वेळेत सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, महावितरण विभागाकडून सर्व वीज ग्राहकांना सूचना करण्यात आली असून, स्मार्ट मीटरमुळे वीज बिल अचूक दिले जात आहे व ग्राहकांनी आपले वीज बिल दिलेल्या तारखेच्या आत भरणे आवश्यक आहे. बिल वेळेत न भरल्यास वीजपुरवठा आपोआप बंद होऊ शकतो, त्यामुळे सर्व ग्राहकांनी आपले वीज बिल वेळेत भरून गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
*प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर*
