जिल्हा परिषद निवडणूक एकत्र घेण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता पुन्हा या निवडणुका लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका एकत्रितच घ्याव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. आता सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार असून, या याचिकेवरील निकालानंतरच या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सुरुवातीच्या टप्प्यात निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणाही केली होती. मात्र काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे गेल्याने आधी जाहीर झाल्यानुसार नगरपरिषद व नगरपालिकांची निवडणूक एकाऐवजी दोन टप्प्यात घ्यावी लागली. सध्या महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात येत्या 15 तारखेला पार पडत आहे. त्यानंतर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा पाळलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया चालू आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा होती. त्यानंतर आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक होईल, असे नियोजन निवडणूक आयोगाने केले होते. मात्र आता सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांच्या संघटनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे आता पुन्हा या निवडणुका लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *