माजी सरपंचाचा मुलगा शेतात गेला, काही वेळाने त्याचा मृतदेहच सापडला; कन्नड तालुक्यातील खुनाने खळबळ!

कन्नड : प्रतिनिधी
शेतात फेरफटका मारायला गेलेल्या तरुणाचा क्षणात त्यांनी वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना कन्नड तालुक्यातील जामडी (घाट) येथे मंगळवारी (दि. 13) उघडकीस आली. राजू रामचंद्र पवार (४५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो माजी सरपंच रामचंद्र पवार यांचा मुलगा तर विद्यमान सरपंच रेणुका पवार यांचा पुतण्या आहे. या खुनामागील कारण राजकीय वैमनस्य आहे की अन्य काही याचा पोलीस शोध घेत आहेत.

राजू पवार यांचे कुटुंब गेल्या पंधरा वर्षांपासून गावातील राजकारणात सक्रिय आहे. राजू पवार यांचे वडील रामचंद्र पवार हे पाच वर्षांपूर्वी गावाचे सरपंच होते. सध्या त्यांच्या काकू रेणुका कैलास पवार या विद्यमान सरपंच आहेत.

राजू पवार हे आपल्या वडिलांचे तसेच विद्यमान सरपंच असलेल्या काकूंचे बहुतांश शासकीय कामकाज बघत होते. या पार्श्वभूमीवर ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज चर्चेतून व्यक्त केला जात आहे.

राजू पवार हे सकाळी शेतात चकर मारायला गेले ते लवकर परत न आल्याने कुटुंबियांनी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन न घेतल्याने घरच्यांनी शेतात जावून पाहिले असता मृतदेह आढळून आला.

कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर येथून श्वानपथक, ठसे तज्ज्ञ, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करण्यात आले मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *