श्री युवराज सिंह कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची थेट मंत्रालयाला भेट

*श्री युवराज सिंह कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची थेट मंत्रालयाला भेट!*

 

*मुंबई दर्शनातून प्रशासकीय कामकाजाचे धडे; ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारशाची घेतली माहिती*

 

गोरेगाव (तालुका प्रतिनिधी) : चुटिया येथील श्री युवराज सिंह कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून थेट महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाला भेट देत शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना शासनाची कार्यपद्धती, प्रशासकीय व्यवस्था आणि निर्णयप्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

महाविद्यालयाची ही शैक्षणिक सहल जिल्हा परिषद, गोंदिया येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री सुधीरजी महामुनी यांच्या परवानगीने तसेच संस्थाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य श्री योपेंद्रसिंह संजय टेमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री के. डी. बोपचे यांनी सहलीचे नियोजन व आयोजन केले.

दिनांक २१ ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या सहलीमध्ये एकूण ४४ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत प्राचार्य श्री के. डी. बोपचे, श्री पाटील सर, श्री दुबे सर, श्री बरवे सर, कुमारी कटरे मॅडम, कुमारी हरिणखेडे मॅडम आणि कुमारी करंजेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी मंत्रालयाला प्रत्यक्ष भेट देऊन विविध प्रशासकीय विभागांचे कामकाज, शासनाची कार्यपद्धती आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया समजून घेतली. शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत कशा पोहोचवल्या जातात, प्रशासकीय विभागांची भूमिका काय असते, याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

याशिवाय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, राजमाता जिजाऊ प्राणिसंग्रहालय (राणीबाग), गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, विधान भवन, शिवाजी पार्क, हाजी अली दर्गा, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी, मुंबई महानगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा मुंबईतील विविध ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.

या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेता आले. ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा, धार्मिक स्थळे आणि प्रशासकीय व्यवस्थेची जवळून ओळख झाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली. ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरली.

 

गोरेगाव तालुका प्रतिनिधि महादेव शेन्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *