काटोल येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, देशी दारूची अवैध वाहतूक उघडकीस आणत ५ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त
काटोल: काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत चारचाकी वाहनातून होणारी देशी दारूची बेकायदेशीर वाहतूक पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी दारूचा साठा आणि वाहन असा एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी काटोल परिसरात गस्त घालत असताना चारचाकी वाहनातून अवैध देशी दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने काटोल हद्दीतील खुटांबा मार्गावर नाकाबंदी केली. या नाकाबंदीदरम्यान संशयित हुंदाई आय १० चारचाकी वाहन क्रमांक एमएच २७ एआर ८६२५ येताना दिसले. पोलिसांनी सदर वाहन थांबवून पंचांसमक्ष वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारू आढळून आली.
या प्रकरणी पोलिसांनी दिनेश उर्फ देवा वासुदेव कोचे वय ३८ वर्षे, राहणार रामनगर कोंढाळी आणि घनश्याम तांदळे वय २७ वर्षे, राहणार काटोल यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून पंचांसमक्ष १८ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या २०० निपा तसेच ५ लाख रुपये किमतीचे हुंदाई आय १० चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
