महागाव-गुंज रस्त्याच्या पॅचवर्कचा महाघोटाळा पुसद बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा कळस…
प्रतिनिधी राम चव्हाण महागांव
महागांव ते गुंज दरम्यानचा डांबरी रस्ता सध्या अक्षरशः चाळणी झालेल्या अवस्थेत असून या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्ते विकासाचा दावा करणाऱ्या पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा कळस या मार्गावरील पॅचवर्कच्या कामातून समोर आला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर तात्पुरत्या स्वरूपाचे थिगळे लावून केवळ लिपापोती केली जात असल्याचा आरोप होत आहे. ‘रस्त्यात खड्डे आहेत की संपूर्ण रस्ताच खड्ड्यात आहे’असा प्रश्न या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे.
हा रस्ता नव्याने आणि दर्जेदार पद्धतीने बांधण्याची नितांत गरज असतांना, दरवर्षी पॅचवर्कच्या नावाखाली शासनाच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांतून केला आहे.या मार्गावर अत्यंत सुमार दर्जाचे डांबर, गिट्टी व चुरी वापरून ‘पैसा वाचवा, पैसा जिरवा’ हा एककलमी कार्यक्रम राबविला जात असल्याचे उघड झाले आहे. प्रत्यक्ष कामाचा दर्जा पाहिल्या नंतर ठेकेदार आणि अभियंत्यांचे उघड संगनमत असल्याचे दिसून येते. गुंज ते फुलसावंगी या सुमारे २० किलोमीटर रस्त्याच्या डागडुजी साठी तब्बल १ कोटी रुपयांचे पॅचवर्क कंत्राट मंजूर करून घेण्यात आले. यात ठराविक कंत्राटदारांना पोसण्या साठी आणि स्वतःचे खिसे भरण्यासाठी हा सर्व घाट घातला गेल्याचा आरोप होत आहे.२०१९ पासून हा रस्ता प्रवासा योग्य राहिलेला नाही, परिणामी या ठिकाणाहून जाणारी सर्व वाहतुक महागाव-खडका-शिरपूर या पर्यायी मार्गाने वळवावी लागत आहे. वापरात नसलेल्या रस्त्यावर दरवर्षी पॅचेसच्या नावाखाली लाखो रुपये हडप करण्याचा धंदा सुरू असून या संपूर्ण ‘गौडबंगालाची’ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कायम स्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात शाखा अभियंता मयूर वंजारे यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, “या संदर्भात आम्ही सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यासाठी वारंवार प्रस्ताव दिलेला आहे. तसेच आमदार किशन वानखेडे यांना सुद्धा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु तो अद्याप प्रलंबित आहे.
शासकीय यंत्रणेच्या या दिरंगाईमुळे आणि निकृष्ट कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी लवकरच तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
सीआरएफ फंडामधून नवीन रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव दाखल करण्यात येणार. कलगाव ते गुंज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक, कारखान्याचे ऊस वाहतूक वाहने सुरू असुन त्यामुळे रस्त्याची अवस्था नेहमीच खराब होत आहे.त्या मुळे या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटच्या कामासाठी केंद्र सरकारच्या सीआरएफ निधीमधून मंजुरी मिळण्यात यावी या करिता नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
मयुर वंजारे,
प्रभारी उपअभियंता सा.बां. उपविभाग महागाव
