महागांव / फुलसावंगीत व्याख्यानांची मेजवानी; विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून फुलसावंगी येथे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी व पालकांसाठीचा विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम दि. १७ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात व दणदणीत प्रतिसादात पार पडला.
सकाळी ११ वाजता स्व. सुधाकरराव नाईक कला व विज्ञान महाविद्यालय, फुलसावंगी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते ‘बेधुंदकार’ गोविंद पोलांड आणि प्रा. निरंजन राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. तहसीलदार श्री. अभय मस्के, मा. ठाणेदार धनराज निळे, उपसरपंच कुणाल नाईक, डॉ. पुंडलीक आमले, डॉ. चंदन पांडे, प्रा. सुरेश राठोड, प्रा. विनोद राठोड, प्रा. सुधीर भाटे आणि प्रा. संदीप चंद्रवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच प्रशासकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा व व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, या उद्देशाने फुलसावंगी पत्रकार संघाने हा उपक्रम राबविला. ‘बेधुंदकार’ गोविंद पोलांड यांनी आपल्या प्रभावी व उत्साही शैलीतून विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा दिली, तर प्रा. निरंजन राठोड यांनी शिक्षण, करिअर नियोजन व मूल्याधिष्ठित जीवनावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी फुलसावंगी पत्रकार संघाच्या वतीने सर्व प्रमुख अतिथी, वक्ते व उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून . आयोजित केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरला असून उपस्थितांकडून कार्यक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
पत्रकार संघ फुलसावंगी
