छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे सगळे गणितच फसल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोन नेत्यांमध्ये उफाळलेला वाद, पक्षांतर गटबाजी आणि नियोजनाचा अभाव याचा फटका पक्षाला बसला. परिणामी 99 जागा लढणाऱ्या या पक्षाचे फक्त सहा उमेदवार निवडून येऊ शकले.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा हा 1988 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1995 पासून सातत्याने महापालिकेवर याच पक्षाची सत्ता राहिली. मध्यंतरी शिवसेनेची शिंदे गट आणि ठाकरे गट अशी दोन शकले झाली आणि शहरातील राजकीय चित्र पालटले. आता दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही त्याचे परिणाम दिसून आले. विशेषत: शहरात उद्धव सेनेची पूर्ती वाताहत झालेली आहे. यांना महापालिका निवडणुकी त शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटांनी 99 उमेदवार उभे केले होते. मात्र या साऱ्यांना निवडून आणून ‘आपूनच बॉस’ हे दाखवून देण्याची संधी या पक्षाने गमावली. कारण आपणच उभ्या केलेल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पक्षाकडून कोणतीही मेहनत घेण्यात आली नाही.
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. महत्त्वाचे म्हणजे या वादाचा दुष्परिणाम निवडणुकीच्या मतदानावर किती होईल याचे भान दोन्हीही नेत्यांनी ठेवले नाही. विशेषता खैरे हे दानवे यांच्या हुकुमशाहीवर सातत्याने टीका करत होते. मतदानाच्या दिवशी तर त्यांनी दानवे यांची अक्कलच काढली. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या काळात एकत्रित बैठका किंवा प्रचार रॅलीही काढली नाही. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी व्यक्त करत होते. मग कशी बाब प्रत्यक्षात उतरलीच नाही. परिणामी ज्या पक्षाचे नेतेच एकत्र नाहीत त्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून देऊन काय फायदा असा निर्णय मतदारांनी घेतला आणि तो अमलात आणूनही दाखवला. अगदी अंबादास दानवे यांना स्वतःच्या भावालाही या निवडणुकीत निवडून आणता आले नाही.
ऐन निवडणुकीच्या आधी पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी पक्षाला रामराम करून भाजप किंवा शिंदे सेनेत गेले. यामुळे पक्षाचे संघटन खिळखिळे झाले. ज्यांच्या जोरावर ही संघटना आजवर निवडणुकीला सामोरे जात होती तेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्याचा फटकाही उद्धव सेनेला बसल्याचे या निवडणुकीचा निकाल सांगतो.
