शिंदेसेनेला सोबत घेणार; महापौर भाजपचाच होणार!; सावेंनी केले स्पष्ट

छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी 

निवडणूक संपली. त्यासोबतच जागांच्या मुद्द्यांवरून असलेले मतभेदही संपले. शिवसेनेचा शिंदे गट आमचा मित्र पक्ष आहे. त्यांना सोबत घेऊनच पुढील पाच वर्षे भारतीय जनता पक्षाचा महापौर काम करेल, असे शहरातील भाजपचे निवडणूक प्रमुख तथा राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 57 जागा मिळाल्या. पक्षाच्या या अभूतपूर्व यशानंतर सावे बोलत होते. ते म्हणाले, शिंदे सेनेसोबतची युती तुटणे दुर्दैवी होते. या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढलो असलो तरी शिंदे सेना हा आमचा मित्रपक्ष आहे. आता निवडणुकीनंतर आम्ही त्यांना सोबतच घेऊ. युती तुटण्याची कारणे आणि निवडणुकीनंतरची परिस्थिती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. झाले गेले विसरून पुढे जाण्याचे आमचे धोरण आहे.

भाजपचे यश

यंदाच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश अमृत पूर्व आहे. खरंतर एवढ्या जागा येतील असे आम्हालाही वाटले नव्हते. पण पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन हे यश मिळवून दिले. 45 हून अधिक जागा येथील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षाही अधिक यश आम्हाला मिळाले आहे. शहराच्या विकासासाठी मतदारांनी पक्षाला गेलेला हा कौल आहे. त्याचा मान नक्कीच राखला जाईल. शहराला नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याचा शब्द आम्ही दिला होता. तो पूर्ण केला जाईलच. संकल्पित, विकसित, संरक्षित, स्वच्छ आणि रोजगारक्षम छत्रपती संभाजीनगरचा जाहीरनामा भाजपने जनतेसमोर ठेवला होता. शहराच्या विकासाचे व्हिजन मांडले होते. निवडणुकीआधी दिलेले हे सर्व शब्द खरे करून दाखवले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॉप शोच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मतदारांसमोर ठेवलेला आराखडा पुढील पाच वर्षात पूर्ण केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *