*१४किलो वजनाचा ओव्हेरियन ट्यूमर यशस्वीरित्या काढला*

*१४किलो वजनाचा ओव्हेरियन ट्यूमर यशस्वीरित्या काढला*

 

*लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर येथे अत्याधुनिक शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाची प्रजनन क्षमता जपली*

(लक्ष्मणराव घवघवे) हिंगणा : लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर येथे एका २२ वर्षीय तरुणीवर तब्बल १४किलो वजनाचा अंडाशयाचा (ओव्हेरियन) ट्यूमर अत्यंत यशस्वीरित्या काढण्यात आला. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची भविष्यातील प्रजनन क्षमता पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आली.

 

सदर रुग्ण गेल्या ३ महिन्यांपासून वाढत्या पोटदुखी, अस्वस्थता व असह्य वेदनांनी त्रस्त होती. तक्रार घेऊन ती एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात दाखल झाली.

 

तातडीने रुग्णाची अल्ट्रासोनोग्राफी व एमआरआय तपासणीसह सखोल क्लिनिकल मूल्यांकन करण्यात आले. तपासणीत जवळजवळ संपूर्ण पोटाच्या पोकळीत पसरलेला आणि आजूबाजूच्या अवयवांवर दाब निर्माण करणारा मोठा ओव्हेरियन ट्यूमर आढळून आला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता स्टेजिंग लॅपरोटॉमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

प्रसूती व स्त्रीरोग विभागातील अनुभवी तज्ञांच्या पथकाने ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान उजव्या अंडाशयातील सुमारे १४ किलोग्रॅम वजनाचा ट्यूमर पूर्णपणे काढून टाकण्यात आला.

 

ट्यूमरच्या फ्रोझन सेक्शन तपासणीत ‘बॉर्डरलाईन ओव्हेरियन ट्यूमर’ असल्याचे निष्पन्न झाले. असे ट्यूमर कमी किंवा अनिश्चित घातक स्वरूपाचे असतात व तरुण वयात दुर्मिळ मानले जातात. रुग्णाचे वय लक्षात घेऊन डॉक्टरांनी अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करत तिची प्रजनन क्षमता अबाधित ठेवली, हे या यशाचे मोठे वैशिष्ट्य ठरले.

 

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली असून तिला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील काळात नियमित फॉलोअपचा सल्ला देण्यात आला आहे.

 

या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी विभाग प्रमुख डॉ. अनुजा भालेराव, तसेच डॉ. सोमलवार, डॉ. कांचन द्विडमुठे, डॉ. प्रवीण करवाडे, डॉ. कांचन दाढे व डॉ. अभिषेक सोनकुसरे यांच्या समर्पित पथकाने मोलाचे योगदान दिले.

 

लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये प्रसूती व स्त्रीरोगाशी संबंधित अवघड आणि गुंतागुंतीच्या केसेस अनुभवी तज्ञांकडून यशस्वीरित्या हाताळल्या जात असून, हे प्रकरण संस्थेतील उच्च दर्जाच्या वैद्यकीय कौशल्यावर आणि मल्टीस्पेशालिटी उपचार व्यवस्थेवर शिक्कामोर्तब करणारे ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *