सावनेर आणि कोंढाळी पोलिसांची अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई, 57,42,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

सावनेर आणि कोंढाळी पोलिसांची अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई, 57,42,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

 

नागपूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली असून, सावनेर आणि कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेती तस्करी आणि जुगार अड्ड्यावर प्रभावी कारवाई केली आहे. सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती वाहतुकीवर छापा टाकून पोलिसांनी 8.44 ब्रास रेती आणि 4 वाहने असा एकूण 57,42,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नमूद आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 3(5) सहकलम 47(7), 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अन्वये 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी यापूर्वी 44,32,500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता.

दुसऱ्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सट्टापट्टी जुगारावर छापा टाकला. कोंढाळी शहरातील बाजार चौक परिसरातील एका पडक्या दुकानात सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे 21/03/2026 रोजी पोलिसांनी छापा टाकून गजानन चांगदेवराव धर्मे (वय 50 वर्ष, रा. शनिवारपेठ, कोंढाळी) आणि विनोद सुभाष जयपूरकर (वय 48 वर्ष, रा. लेंडीपुरा, कोंढाळी) यांना रंगेहात पकडले. तपासात फहीम शेख (रा. बाजार चौक, कोंढाळी) याच्या सांगण्यावरून हा जुगार चालवला जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून 10,415 रुपये रोख आणि 11,000 रुपये किमतीचे भ्रमणध्वनी असा एकूण 21,415 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 49 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली असून पुढील तपास कोंढाळी पोलीस करीत आहेत.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *