उमरखेड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारावरच खोटे गुन्हे दाखल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उमरखेड प्रतिनिधी मोहम्मद शेख उर्फ बबलू
धाडस 007 या युट्यूब न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार अमित वसंतराव देशमुख यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, गांजा, गुटखा, मटका व अवैध वाहतूक यांविरोधात सातत्याने बातम्या प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच दिनांक 10/03/2026 रोजी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, Yavatmal District Police यांच्याकडे याबाबत लेखी तक्रारही केली होती.
या तक्रारीचा राग मनात धरून उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार अमित देशमुख यांच्यावर आकसापोटी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप पत्रकार बांधवांनी केला आहे. दिनांक 12/03/2026 रोजी रात्री पोलीस स्टेशनला बोलावून, पत्रकार म्हणून माहिती विचारत असताना, त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जातीय तेढ निर्माण केल्याचे आरोप लावण्यात आले.
विशेष म्हणजे, संबंधित पत्रकार हा एमपीएससी परीक्षेची तयारी करणारा सुशिक्षित युवक असून समाजातील अनिष्ट प्रथा व अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवत होता. अशा युवकावर खोटे गुन्हे दाखल करून त्याचे शैक्षणिक व सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे उमरखेड तालुक्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून, भविष्यात कोणताही पत्रकार अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणार नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
पत्रकार बांधवांनी या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करून, पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल केलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्याची व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
✊ पत्रकारांची प्रमुख मागणी
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी
दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी निवेदन देताना उमरखेड मधील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
पत्रकारांचे संरक्षण सुनिश्चित करावे
