मौदा पोलिसांची मोठी कारवाई: ४३ लाखांच्या मालासह ट्रेलर जप्त, आरोपी २४ तासांत गजाआड!
मौदा : स्टील ट्रेडिंगच्या मालात अफरातफर करून पसार झालेल्या ट्रेलर चालकाला मौदा पोलिसांनी अत्यंत शिताफीने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून १८ चक्का ट्रेलर आणि ७ टन लोखंडी सळई, असा एकूण ४३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कामठी येथील फिर्यादी हर्ष अग्रवाल यांना ‘अभी इंजिनीअरिंग’ कंपनीसाठी ३२ एमएमच्या लोखंडी बारची ऑर्डर मिळाली होती. त्यांनी चंद्रपूर येथील कंपनीकडून ३४ टन मालाची खरेदी केली. हा माल १८ चक्का ट्रेलर (क्रमांक MH 40 BF 0088) मध्ये भरून पाठवण्यात आला होता. मात्र, चारभा येथील कॅम्पवर माल पोहोचला असता, त्यातून ६ ते ७ टन माल गायब असल्याचे आढळले. संशय येताच ट्रेलर चालक ट्रेलरसह तेथून पसार झाला.
पोलिसांनी असा लावला छडा
फिर्यादीच्या तक्रारीनंतर मौदा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून उमरी फाटा येथून ट्रेलर जप्त केला. यानंतर नागपूर शहरातून आरोपी चालक मातादीन विधीचंद्र माहौर (वय ३९ वर्ष, रा. मुरैना, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.
१८ चक्का ट्रेलर: किंमत ४०,००,०००/- रुपये
७ टन लोखंडी बार: किंमत ३,९०,०००/- रुपये
एकूण: ४३,९०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कामगिरी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड मौदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारीण दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मौदा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे. आरोपीला सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
