सव्वासहा कोटींच्या कथित शासकीय थकबाकीचा हिशोब द्या; ग्रीन झोन व शासकीय जमिनीवरील अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाईची मागणी :
उमरखेड शहरातील खंड क्र. १ व २ मधील कथित अनधिकृत लेआउट, ग्रीन झोन व आरक्षण क्षेत्रातील कथित विकास तसेच शासकीय जमिनीवरील कथित व्यवहारांचा मुद्दा आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचला आहे.
२८ सप्टेंबर रोजी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते शेख इरफान शेख ईसा यांनी महसूल मंत्र्यांना निवेदन देऊन सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, संबंधित प्रकरणांत अंदाजे .६.२५ कोटी रुपयांची दंड व शासकीय थकबाकी.प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला आहे. या रकमेची अद्ययावत मागणी, वसुलीची सद्यस्थिती, ७/१२ उताऱ्यांवरील बोजे व महसूल नोंदी तपासण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच सर्वे नं. १३९/१/ब सह कथित ग्रीन झोन व आरक्षण क्षेत्राची महसूल, नगर रचना व नगरपरिषद विभागामार्फत संयुक्त स्थळपाहणी, मोजणी व पंचनामा करून मंजूर लेआउट, विकास परवानगी, झोन नकाशा व फेरफार नोंदी तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शासकीय जमिनीवरील कथित व्यवहार व अनधिकृत विकास आढळल्यास MRTP अधिनियम व लागू महसूल कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच यामध्ये जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका आढळल्यास नियमानुसार चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, ६.२५ कोटींची थकबाकी व कथित अनधिकृत विकासाबाबतची अंतिम वस्तुस्थिती ही अधिकृत अभिलेख, प्रत्यक्ष स्थळपाहणी व सक्षम प्राधिकरणाच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
उमरखेड तालुका
प्रतिनिधी : बबलू उर्फ मोहम्मद शेख . 9067934036
