वन्यप्राण्यांसाठी जंगलातील पाणवठ्यांवर पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी
सोयगाव, दि. ११ तालुका सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
तालुक्यातील सावरखेडा येथे (दि.९) रात्री १० वाजून २५ मिनिटांच्या सुमारास श्री हनुमान मंदिराजवळ अस्वलाचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांच्या निदर्शनास अस्वल येताच त्यांनी त्याला तेथून हाकलून लावले.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जंगलातील वन्यप्राण्यांना पाणी व खाद्य उपलब्ध होत नसावे. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. हिवाळ्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याने वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.
जंगलातील पाणवठ्यांवर पाणी भरण्याची मागणी
वनविभागाने जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच वन्यप्राणी गावात येऊ नयेत आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दीपक सपकाळ यांनी केली आहे.
फोटो ओळ : सावरखेडा येथे श्री हनुमान मंदिराजवळ रात्रीच्या वेळी अस्वलाचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
