🔴 तुमसर पोलिसांची दणकेबाज कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ‘मिनी ट्रक’ जप्त, १० लाखांचा माल जप्त!
🎯 …पण तुमसरच्या तहसीलदारांना डोळे असून हा अवैध धंदा का दिसत नाही? जनतेचा संतप्त सवाल!
भंडारा:
तुमसर पोलिसांनी आज दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी हसारा परिसरात गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत अवैध रेती (वाळू) वाहतूक करणारा एक मिनी ट्रक जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे कौतुक होत असतानाच, दुसरीकडे स्थानिक महसूल विभाग आणि विशेषतः तुमसर तहसीलदार यांच्या भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
🚛 पोलिसांची दणकेबाज कारवाई; २४ वर्षीय चालक अटकेत
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हसारा परिसरातून मिनी ट्रकद्वारे अवैध रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा हसारा ते तुमसर रोडवर सापळा रचला.
यादरम्यान अशोक लेलँड कंपनीचा मिनी ट्रक (क्र. MH 35 AJ 5659) थांबवून तपासणी केली असता, त्यात कोणतीही रॉयल्टी किंवा वाहतुकीचा परवाना नसलेली अवैध रेती आढळून आली. पोलिसांनी तात्काळ ट्रक चालक प्रतिक संजय कुंभरे (वय २४ वर्षे, रा. सुंदरटोला) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६,००० रुपये किमतीची १ ब्रास रेती आणि १० लाख रुपयांचा मिनी ट्रक, असा एकूण १०,०६,००० रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई तिलक चौधरी यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध अपराध क्र. १०८०/२०२६ कलम ३०५ (e), ४९ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
