बजाजनगर परिसरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाची धडक कारवाई, तब्बल ४२ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
नागपूर:
बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली मोठी घरफोडी उघडकीस आणण्यात नागपूर शहर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल ४२ लाख ७९ हजार ९९० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
बजाजनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंद क्रमांक ५०४/२०२६ दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेचे घरफोडी विरोधी पथक करत होते. तपासादरम्यान पथकाने घटनास्थळ व परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.
या तपासाच्या आधारे पोलिसांनी करण खेमचंद मेश्राम (वय १९ वर्षे, रा. लष्करीबाग, तक्षशिला बौद्धविहाराजवळ, गल्ली क्र. ८, पोलीस ठाणे पाचपावली हद्द) याला आणि त्याच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली.
त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ४२ लाख ७९ हजार ९९० रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. यात २९६.०७ ग्रॅम (अंदाजे २९ तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे ४१ लाख ४४ हजार ९८० रुपये) आणि ६२४.९३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (किंमत अंदाजे १ लाख २४ हजार ९८६ रुपये) यांचा समावेश आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास रीतसर अटक करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल बजाजनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार प्रशांत गभने, पोलीस हवालदार गणेश बरडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन तिवारी, पोलीस शिपाई पंकज निकम, पोलीस शिपाई अमन राऊत आणि पोलीस शिपाई सुधीर पवार यांनी पार पाडली. तसेच या तपासात गुन्हे शाखेच्या सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक झिंगरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक सहकार्य करत विशेष भूमिका बजावली.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
