अफू तस्करीच्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश; दोन सख्खे भाऊ अटकेत
२.००३ किलो अफूसह ३०.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त; नागपूर ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई, मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील आरोपी
नागपूर, प्रतिनिधी : नागपूर ग्रामीण पोलिसांनी अफूच्या अवैध तस्करीविरोधात मोठी कारवाई करत दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. आरोपींकडून २.००३ किलो अफू, दोन चारचाकी वाहने, पाच मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ३० लाख ६५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागपूर ग्रामीण पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि भिवापूर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर ग्रामीण पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक बुटीबोरी परिसरात गस्त घालत होते. यावेळी गुप्त माहितीदाराकडून मध्य प्रदेश आणि राजस्थान पासिंगच्या बोलेरो पिकअप व इकोस्पोर्ट कारमधून अफूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित वाहनांचा शोध सुरू करण्यात आला.
दरम्यान, बेला ते सार्शी मार्गावर दोन्ही संशयित वाहने दिसून आली. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकांनी वेगाने भिवापूरच्या दिशेने वाहने पळवली. त्यानंतर भिवापूर पोलिसांच्या मदतीने दोन्ही वाहनांचा पाठलाग करण्यात आला. नांदा गावाजवळ पोलिसांनी घेराव घालून दोन्ही वाहने थांबविली.
इकोस्पोर्ट कारच्या डिकीत आढळली अफू
पंचांसमक्ष दोन्ही वाहनांची तपासणी केली असता इकोस्पोर्ट कारच्या डिकीत अफूचे दोन पुडे आढळून आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींची नावे पवन सत्यनारायण पाटीदार (वय ३०) आणि लोकेशकुमार सत्यनारायण उर्फ कालिदास पाटीदार (वय ३२) अशी निष्पन्न झाली. दोघेही सख्खे भाऊ असून मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील जावद तहसीलअंतर्गत बसेडीभाटी गावचे रहिवासी आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पवन हा इकोस्पोर्ट कारमधून अफूची वाहतूक करीत होता, तर त्याचा भाऊ लोकेशकुमार बोलेरो पिकअप वाहनातून पुढे चालत होता. मार्गावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून मागून येणाऱ्या कारसाठी रस्ता मोकळा असल्याची खात्री तो करीत होता. अशा प्रकारे बोलेरो पिकअपचा वापर पुढील मार्गाची माहिती देणारे वाहन म्हणून केला जात होता.
३०.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी २.००३ किलो अफू जप्त केली असून तिची किंमत १० लाख १ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय इकोस्पोर्ट कार (क्रमांक आरजे ०९ सीसी ०३३९) आणि महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक एमपी १३ एएल ८७९५) अशी दोन वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांची एकत्रित किंमत २० लाख रुपये आहे. तसेच २ हजार ५०० रुपये रोख आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३० लाख ६५ हजार ४०० रुपये आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के तसेच उमरेड उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अंकुश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, भिवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंह देवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार प्रवीण देव्हारे, पोलीस हवालदार प्रकाश ठोके, नायक पोलीस शिपाई अमोल नागरे, पोलीस शिपाई अनिल खरडखेले आणि वाहनचालक पोलीस शिपाई अविनाश तोडसाम यांनी सहभाग घेतला.
तसेच भिवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन उरकुडे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गेडाम, पोलीस हवालदार सतीश राठोड, पोलीस शिपाई रोशन साहारे आणि सायबर सेलच्या पथकानेही या कारवाईत सहकार्य केले.
या प्रकरणी भिवापूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), १७(ख), २२ आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून अफू तस्करीच्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
