केळवद पोलिसांची मोठी कारवाई: सराईत गुन्हेगार सोहम खंडारे याला एमपीडीए कायद्यांतर्गत केले स्थानबद्ध
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आरोपीची भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी; परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांचे कठोर पाऊल
नागपूर (केळवद):
नागपूर ग्रामीण पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी कठोर कारवाई केली आहे. केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सोहम पंजाबराव खंडारे (वय २० वर्षे) याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोहम पंजाबराव खंडारे (राहणार पंचशील नगर, ईसासनी, तालुका हिंगणा, पोलीस ठाणे एमआयडीसी, नागपूर शहर, जिल्हा नागपूर) हा केळवद पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध केळवद पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये साथीदारांसह जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दरोड्याचा प्रयत्न करणे, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे, साथीदारांसह घरात घुसून कोणाच्याही जिवाला धोका निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव तयार करणे, तोडफोड करून नुकसान करणे तसेच अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, तरीही त्याने आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. त्याच्या कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि तो समाजासाठी धोकादायक ठरत होता.
सामाजिक सुव्यवस्थेला निर्माण झालेला धोका लक्षात घेता, नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली केळवद पोलिसांनी आरोपीविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई सुरू केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोहम खंडारे याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश काढला. आदेश प्राप्त होताच केळवद पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याला ताब्यात घेतले आणि जिल्हा मध्यवर्ती कारागृह, भंडारा येथे स्थानबद्ध केले.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
