ग्रामविकासासाठी युवकांचा पुढाकार; कोलंबीत स्वखर्चातून वृक्षारोपण उपक्रमाला सुरुवात

*ग्रामविकासासाठी युवकांचा पुढाकार; कोलंबीत स्वखर्चातून वृक्षारोपण उपक्रमाला सुरुवात*

 

तालुका प्रतिनिधी ओमकार पोतलवाड

 

कोलंबी, ता. नायगाव, जि. नांदेड : गावाचा विकास केवळ ग्रामपंचायतीच्या निधीतूनच नव्हे, तर गावातील युवकांच्या एकजुटीतूनही होऊ शकतो, हे कोलंबी येथील युवकांनी कृतीतून दाखवून दिले आहे.

 

कोलंबी गावातील एका युवकांच्या ग्रुपच्या माध्यमातून मागील पंधरा दिवसांपासून गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावात वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 

या उपक्रमासाठी कोणत्याही ग्रामपंचायतीचा निधी किंवा शासकीय निधी न घेता, गावातील युवकांनी स्वखर्चातून एकत्रितपणे वृक्षांची रोपे आणली असून, गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी युवकांनी स्वतःहून आर्थिक योगदान देत सहभाग नोंदवला आहे.

 

आज रविवारच्या दिवशी युवकांची बैठक घेऊन या वृक्षारोपण उपक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले. गावाचा विकास झाला पाहिजे आणि आपल्या गावासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, हा ठाम निश्चय युवकांनी व्यक्त केला.

 

“गावचा विकास झालाच पाहिजे, गावासाठी काहीतरी करून दाखवायचे” या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

 

गावातील युवकांनी एकत्र येऊन स्वतःच्या खर्चातून सुरू केलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, वृक्षारोपणासोबतच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांची ही एकजूट भविष्यातही कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *