महागाव बसस्थानक परिसरात २०० मीटरच्या हद्दीत अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रतिबंध; प्रशासनाची कठोर अंमलबजावणी
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर
माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या आदेशानुसार तसेच विभाग नियंत्रक अमृत कचवे व आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत महागाव बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अवैध प्रवासी वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
सदर कारवाईची प्रभावी अंमलबजावणी वाहतूक नियंत्रक बापूजी पारवेकर हे करत असून बसस्थानक परिसरात नियमित पाहणी व तपासणी सुरू आहे. या उपक्रमामुळे एसटी महामंडळाच्या महसूल वाढीस मदत होणार असून प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य मिळणार आहे.
महागाव बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे प्रवासी व नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तसेच सर्व वाहनचालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
