गावठी बनावटीच्या देशी पिस्तुलासह आरोपी जेरबंद; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त
जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव
यवतमाळ जिल्ह्यातील अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळ यांनी मोठी कारवाई करत महागाव पोलीस स्टेशन हद्दीत एका इसमास गावठी बनावटीच्या देशी पिस्तुलासह अटक केली. या कारवाईत एक देशी पिस्तुल (अनधिकृत) व एक जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपी शोध मोहिमेवर असताना गुप्त माहिती मिळाली की, आंबोडा गावाजवळील तुळजापूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेल परिसरात एक व्यक्ती गावठी पिस्तूल बाळगून फिरत आहे. माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव रवि संतोष शिंगारे (वय 29 वर्षे, रा. धर्मनगर, श्रीरामपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे 30 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे देशी पिस्तूल तसेच 1 हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी महागाव पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत एलसीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातील ही कारवाई जिल्हा पोलिसांच्या गुन्हेगारीविरोधातील कठोर भूमिकेचे द्योतक मानली जात आहे.
