लग्नाचे आमिष, अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल; फरार आरोपी अखेर डीबी पथकाच्या जाळ्यात
महिलेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत सोशल मीडियावर अश्लील सामग्री प्रसारित; नांदेड येथून आरोपी ताब्यात
उमरखेड :
महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, उमरखेड पोलिसांनी अशाच एका गंभीर प्रकरणातील फरार आरोपीला अटक करून कायद्याचा धाक कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
उमरखेड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अप. क्र. 487/2026 मधील आरोपी बलदेव उर्फ गोलू शंकर राठोड (वय 27), रा. विटाळा, ता. दिग्रस, जि. यवतमाळ याने एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणामुळे पीडित महिलेच्या सन्मानावर व गोपनीयतेवर गंभीर आघात झाल्याचे दिसून येते.
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69, 308(1), माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(E), 67(A) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा उघडकीस आल्यानंतर आरोपी नांदेड व पुणे परिसरात फरार झाला होता. मात्र उमरखेड पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार व सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेत अखेर त्याला नांदेड येथून ताब्यात घेतले. सध्या त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या कारवाईमुळे महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्या व सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांना कायद्यापासून पळ काढता येणार नाही, असा स्पष्ट संदेश उमरखेड पोलिसांनी दिला आहे.
या यशस्वी कारवाईस पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
कारवाई करणाऱ्या डीबी पथकात सपोनि व्यंकट गंगलवाड, पोउपनि शरद लोहकरे, पो.कॉ. दिगांबर गीते, पो.कॉ. संघशील टेंबरे आणि डीपो.कॉ. आकाश पवार यांचा समावेश होता.
सिटी इंडिया न्यूज चॅनेल तालुका प्रतिनिधी बबलू उर्फ मोहम्मद शेख.9067934036
