महागाव हद्दीत ४८० किलो ५०० ग्रॅम गोमांस जप्त; ६ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; बोलेरो पिकअप व ऑटो रिक्षासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
महागाव :
दि. ५ ऑक्टोबर २०२६ : यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध वाहतूक व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडका फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेल्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४८० किलो ५०० ग्रॅम गोमांस, बोलेरो पिकअप व ऑटो रिक्षा असा एकूण ६ लाख ९४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक कुमार चिंत्ता यांनी यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्रे, अवैध उत्खनन तसेच गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेला प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी आपल्या अधिनस्त पथकांना गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे निर्देश दिले.
दि. ५ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात अवैध गुन्हे, पाहिजे व फरार आरोपींच्या शोधासाठी गस्त घालत असताना महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडका फाटा येथे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. पोखरी ते खडका रोडने एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपमधून प्रतिबंधित गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.
यावेळी MH-27 X-1860 क्रमांकाची बोलेरो पिकअप तसेच क्रमांक नसलेली ऑटो रिक्षा संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी दोन्ही वाहनांची तपासणी केली असता बोलेरो वाहनामध्ये ६ प्लास्टिक पोत्यांमध्ये, तर ऑटो रिक्षामध्ये ३ प्लास्टिक पोत्यांमध्ये गोमांस आढळून आले. दोन्ही वाहनांमधील गोमांसाचे एकूण वजन ४८० किलो ५०० ग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शेख अन्वर शेख दाऊद, वय ३८ वर्षे, रा. वॉर्ड क्र. १, माहूर, ता. माहूर, जि. नांदेड तसेच मुजाहिद खान अफजल खान पठाण, वय ३२ वर्षे, रा. वॉर्ड क्र. २, माहूर, ता. माहूर, जि. नांदेड यांच्याविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम सन १९९५ मधील कलम ५(क), ५(ब), ९, ९(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायद्याने बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कशी?
या कारवाईमुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. कायद्याने प्रतिबंध असतानाही तब्बल ४८० किलो ५०० ग्रॅम गोमांसाची वाहतूक करण्याचे धाडस नेमके कशाच्या जोरावर करण्यात आले? या वाहतुकीमागे आणखी कोणी व्यक्ती, पुरवठादार किंवा मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास होणे आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक होत असल्याने त्याचा स्रोत, वाहतुकीचा मार्ग आणि अंतिम ठिकाण याचा तपास प्रशासनाने गांभीर्याने करणे अपेक्षित आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक कुमार चिंत्ता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड गौरव कायंदे पाटील, पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ/मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरे, पोहे/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनील पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने सहभाग घेतला. त्यांच्या कारवाईमुळे प्रतिबंधित गोमांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाच्या पुढील तपासातून या वाहतुकीमागील संपूर्ण साखळी समोर येते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संजय वाघमारे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ संपर्क क्रमांक 9302601023
