वाकान ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; सदस्य आरक्षण सोडत जाहीर, इच्छुकांच्या राजकीय गणितांना वेग
जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ
महागाव तालुक्यातील वाकान ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार (दि. १२ जून २०२६) रोजी उत्साहात पार पडला. अधिकृत अधिकारी तथा ग्राम महसूल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष ग्रामसभेत विविध प्रवर्गांसाठी सदस्य पदांचे आरक्षण सर्वानुमते सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले.
आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जाती (एससी) महिला व सर्वसाधारण पुरुष यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला, सर्वसाधारण पुरुष आणि सर्वसाधारण महिला अशी आरक्षणे निश्चित करण्यात आली. तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष यांच्यासाठी सदस्य पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
आरक्षण सोडत जाहीर होताच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग आला असून, गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या विशेष ग्रामसभेला ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.
