काळी दौ.वन विभागाचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर? इजनी शेतशिवारात बिबट्याची दहशत; कारवाईअभावी नागरिकांमध्ये संताप
प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव
महागाव तालुक्यातील काळी (दौ.) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या इजनी शेतशिवारात बिबट्याचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या दोन दिवसांत दोन वासरांची शिकार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांमध्ये वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकरी अवधूत रामराव पाचकोरे व संतोष शोभराव पाचकोरे यांच्या गोठ्यातील दोन वासरांवर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
मान्सून सुरू झाल्याने खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. शेतकरी दिवस-रात्र शेतात काम करत असून अनेकांना पिकांच्या संरक्षणासाठी शेतातच मुक्काम करावा लागत आहे. जनावरेही शेतातील गोठ्यांमध्ये ठेवली जात असल्याने बिबट्याचा वाढता वावर शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका बनला आहे.
स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की, बिबट्याच्या हालचालींबाबत वारंवार माहिती देऊनही काळी (दौ.) वन विभागाकडून तत्पर कारवाई करण्यात आलेली नाही. घटनास्थळी त्वरित पाहणी, पिंजरा लावणे, रात्रीची गस्त वाढविणे आणि नागरिकांना सतर्क करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे वन विभागाच्या निष्क्रियतेमुळेच बिबट्याचा वावर वाढत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात जनावरांचे नुकसान होऊनही नुकसानभरपाईची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आधी जनावरांचे नुकसान आणि त्यानंतर भरपाईसाठी हेलपाटे, अशा दुहेरी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी वन विभागाला इशारा देत सांगितले की, जनावरांनंतर आता मानवी जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील. कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, गस्त वाढवावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी अवधूत पाचकोरे, संतोष पाचकोरे तसेच परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या इजनी परिसरात भीतीचे वातावरण असून, वन विभागाने कागदी कारवाईपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्षात प्रभावी उपाययोजना करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
