मौदा पोलिसांची धडक कारवाई: दुकानफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघड; ९८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त!

मौदा पोलिसांची धडक कारवाई: दुकानफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघड; ९८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त!

 

मौदा:

स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौदा परिसरातील एका मोबाईल दुकानात झालेली धाडसी चोरी उघडकीस आणण्यात मौदा पोलिसांना अवघ्या १२ तासांत यश आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील ९८,१०० रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

 

१२ तासांत गुन्ह्याचा छडा

फिर्यादी विशाल शालीकराम फंदी (वय ३१, रा. पावडदौना) यांचे आयुषी मोबाईल नावाचे दुकान आहे. दि. १४ जुलै ते १५ जुलै २०२६ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून लॅपटॉप, विविध कंपन्यांचे मोबाईल, टॅब, इयर बड्स, मेमरी कार्ड आणि ब्लूटूथ स्पीकर असा एकूण ५८,१०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून मौदा पोलीस स्टेशनमध्ये कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

 

गुप्त बातमीदाराचे जाळे आणि तातडीने अटक

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मौदा पोलिसांच्या तपास पथकाने तातडीने चक्र फिरवली. दि. १६ जुलै रोजी मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना (नाबालिक) मौदा येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी मोबाईल दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.

 

मुद्देमाल जप्त

पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत गुन्ह्यात चोरीला गेलेला ५८,१०० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली ४०,००० रुपये किमतीची दुचाकी, असा एकूण ९८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठांचे मार्गदर्शन व टिमचे कौतुक

ही यशस्वी कारवाई नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (कन्हान उपविभाग) श्री. संतोष गायकवाड, मौदा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.सरीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मौदा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली. पोलिसांच्या या अत्यंत वेगवान आणि अचूक कामगिरीमुळे नागरिकांमधून मौदा पोलिसांचे विशेष कौतुक होत असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

 

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *