तुमसर पोलिसांची धडक कारवाई; अवैध मोहाफास साठवणुकीचा पर्दाफाश करत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त!तुमसर:
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या तुमसर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे अत्यंत प्रभावीपणे सापळा रचून पोलिसांनी अवैध मोहाफास साठवणूक करणाऱ्या एका मोठ्या अड्ड्यावर धाड टाकली. या धडक कारवाईत एकूण १,५२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत पिपरा येथील रहिवासी आरोपी रविशंकर फोगंल कुमलकर (वय ३० वर्ष) हा मौजा पिपरा शेतशिवारातील नाल्याच्या काठावर अवैध मोहाफास सडवा घेऊन असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वेळ न गमावता पोलीस हवालदार टेकाडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी झडती घेतली. यावेळी आरोपीच्या ताब्यातून प्रत्येकी २० किलो प्रमाणे ३८ प्लास्टिक पुंगळ्यांमध्ये भरलेला एकूण ७६० किलो सडवा मोहाफास जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध अप. क्र. ८५४/२०२६ कलम ६५ (फ) म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही यशस्वी आणि कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन सा., अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे सा. आणि पो.नि. बारसे सा. यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली पो.हवा टेकाडे आणि तुमसर पोलीस पथकाने अत्यंत चोखपणे पार पाडली. गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या या कामगिरीबद्दल तुमसर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
