धडाकेबाज कारवाई! तुमसर पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी धाड; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक, तर सुस्त तहसीलदार रडारवर?
तुमसर :-
तुमसर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्या माफियांविरोधात एक अतिशय उत्कृष्ट आणि धाडसी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तब्बल ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या अत्यंत कौतुकास्पद आणि कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, दुसरीकडे डोळे झाकून बसलेल्या स्थानिक तहसीलदार प्रशासनाच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गुप्त माहितीवरून पोलिसांनी आवळले पाश…!!
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२/०७/२०२६ रोजी तुमसर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मौजा रविदाना बाई परिसरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, एका ट्रॅक्टरमधून अवैध रेतीची चोरी करून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष तात्काळ सदर ट्रॅक्टर थांबवून त्याची पाहणी केली.
या पाहणीत स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. MH36AL6193) आणि रेतीने भरलेली निळ्या रंगाची ट्रॉली (क्र. MH 36 AR1032) अवैध रेतीची चोरी करताना रंगेहात पकडण्यात आली. पोलिसांनी ७ लाख रुपयांचा ट्रॅक्टर, १ लाख रुपयांची ट्रॉली आणि अंदाजे ६ हजार रुपयांची १ ब्रास रेती असा एकूण ८,०६,०००/- रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महेंद्र फकिरा मारबदे (वय ३८ वर्षे, रा. उमरवाडा, तह. तुमसर, जि. भंडारा) याला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात अप क्र. ८५३/२०२६, कलम ३०५(ई) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन सा., अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे सा. आणि पो.नि. बारसे सा. यांच्या मार्गदर्शनात पो.शि. महेश व तुमसर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक करावे तितके कमीच आहे.
सगळे काम पोलिसांनीच करायचे तर तुमसर तहसीलदार आणि मंडळ अधिकारी काय करणार? कारवाईची मागणी!
पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता कौतुकास पात्र असली, तरी या निमित्ताने तुमसरचे तहसीलदार महसूल प्रशासनाचा ढिसाळ आणि संशयास्पद कारभार चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यात अवैध रेती उपसा रोखण्याची आणि त्यावर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी तुमसर तहसीलदार आणि त्यांच्या महसूल पथकाची असते. परंतु, तहसीलदार तुमसर यांच्या नाकाखाली इतकी मोठी अवैध रेती वाहतूक सुरू असताना महसूल विभाग झोपा काढत होता का? असा संतप्त सवाल तुमसर तालुक्यातील नागरिक विचारत आहेत.
पोलिसांना मिळणारी गुप्त माहिती तहसीलदारांना का मिळत नाही? की या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे? अशी शंका आता उपस्थित होत आहे. पोलिसांचे कौतुक होत असतानाच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या तुमसर तहसीलदारांवर वरिष्ठ जिल्हाधिकाऱ्यांनी आणि महसूल विभागाने तात्काळ चौकशी करून कडक दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करावी, अशी जाहीर मागणी आता जनतेमधून आणि सुजाण नागरिकांमधून केली जात आहे.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
