महामार्गावर मध्यरात्री गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळला: २७ लाखांच्या ट्रकसह २५ गोवंशांची सुटका
सिहोरा वळणावर नाकाबंदी पाहून अंधारात ट्रक सोडून चालक पसार; कन्हान पोलिसांत गुन्हा दाखल, फरार आरोपींचा कसून शोध सुरू
कन्हान:
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक करण्याचा तस्करांचा डाव नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. पोलिसांनी सिहोरा वळणाजवळ नाकाबंदी करून १२ चाकी ट्रकमधून २५ गोवंशांची सुखरूप सुटका केली असून, ट्रकसह एकूण २७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, पोलिसांचा पहारा पाहताच चालक महामार्गावरच वाहन उभे करून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला. याप्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात वाहनमालक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २८ सप्टेंबरच्या रात्री कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांच्या प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. या दरम्यान एका अवजड ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ राष्ट्रीय महामार्गावरील सिहोरा वळणावर नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. काही वेळातच संशयित १२ चाकी ट्रक क्रमांक एमएच-३४/एबी-९३५८ येताना दिसला. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने काही अंतरावरच गाडी थांबवली आणि खाली उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता, ट्रकमध्ये २५ गोवंश अत्यंत निर्दयतेने कोंबलेले आढळून आले. जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, अत्यंत अरुंद जागेत दाटीवाटीने डांबून आणि त्यांच्या शिंगांना व पायांना आखूड दोरखंडाने जखडून त्यांची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी घटनास्थळावरून २५ लाख रुपये किमतीचा १२ चाकी ट्रक आणि २ लाख १५ हजार रुपये मूल्याचे २५ गोवंश, असा एकूण २७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कन्हान पोलिसांनी फरार चालक व वाहनमालकाविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या सुसंगत कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. पोलीस आता फरार चालकाचा माग काढत असून, या रॅकेटमधील वाहनमालकाला जेरबंद करण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
