गावठी पिस्तुलासह तरुण पोलिसांच्या जाळ्यात*

*गावठी पिस्तुलासह तरुण पोलिसांच्या जाळ्यात*

 

पोफळी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

 

 

पोफाळी :

यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, पोफळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी बनावटीची देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या २३ वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

जिल्ह्यात अवैध शस्त्रांचा वापर, अवैध धंदे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंताभा.पो.से. यांनी स्थानिक गुन्हे शाखेला प्रभावी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेत असताना १९ सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली.

 

तरोडा फाटा, पुसद ते उमरखेड मार्गावरील एका हॉटेलजवळ एक इसम गावठी बनावटीची देशी पिस्तूल घेऊन थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव शेख अरबाज शेख रोशन (वय २३, रा. वरूड, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे सांगितले.

 

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे ३० हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची देशी पिस्तूल आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस, असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी शस्त्र व काडतूस जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले. याप्रकरणी पोफळी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

 

या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण होण्यास मदत झाली असून, संभाव्य अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंताभा.पो.से., अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात म.पो.से., सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे पाटील भा.पो.से. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश चव्हरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे, पोफळी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि. अमोल राठोड, पोउपनि. सुरेश शिंदे, सफौ. मुन्ना आडे, सफौ. संतोष भोरे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि. सुनील पंडागळे, चापोउपनि. रवींद्र शिरामे, चापोशि. राजेश जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पोफळी पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

 

तालुका प्रतिनिधी बबलू उर्फ मोहम्मद शेख संपर्क क्रमांक 90679 34036

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *