गंभीर आर्थिक गौरव्यवहाराच्या आरोपावर तहसीलदार यांना तात्काळ निलंबित करा 

गंभीर आर्थिक गौरव्यवहाराच्या आरोपावर तहसीलदार यांना तात्काळ निलंबित करा

 जिल्हा अधिकाऱ्याकडे राष्ट्रीय लहू शक्तीची लेखी मागणी

 लोकशाही अण्णाभाऊ साठे योजनेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण चौकशी सह कठोर कारवाईची मागणी

लोकन्याय न्यूज नेटवर्क | यवतमाळ एस के शब्बीर

महागावचे तहसीलदार अभय मस्के यांना महसूल विभागातून तात्काळ पदमुक्त करून त्यांच्या निलंबनाची शासनाकडे शिफारस करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय लहूशक्ती जिल्हा संघटक सचिव लखन रामराव लोंढे यांनी सोमवारी (दि. २२ जून २०२६) जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना लेखी पत्र सादर केले.

निवेदनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील निधीबाबत गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले असून, संबंधित प्रकरणात यापूर्वीही प्रशासकीय कारवाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्याकडे महसूल विभागाची जबाबदारी कायम ठेवणे जनतेच्या विश्वासाला तडा देणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, महागाव येथे तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर समाजाला न्याय न मिळाल्याचा तसेच प्रशासनाकडून त्रास दिल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. शासनाच्या निधीपैकी ₹९ कोटी ५२ लाख ७२ हजार १०० इतक्या रकमेच्या कथित अपहाराबाबत जिल्हाधिकारी नियुक्त चौकशी समितीने ठपका ठेवल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. याच प्रकरणात संभाजीनगर येथे तहसीलदार तथा नगरपालिका प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असताना निलंबनाची कारवाई झाल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

या सर्व आरोपांची निष्पक्ष व वस्तुनिष्ठ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना महसूल विभागातून तात्काळ पदमुक्त करण्याची व निलंबनाची शिफारस शासनाकडे करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अण्णाभाऊ साठे समिती आणि मातंग समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *