सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण; बडूरमध्ये महिला सरपंचांनी जपला देशसेवेचा मान!

सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण; बडूरमध्ये महिला सरपंचांनी जपला देशसेवेचा मान!

 

बडूर | दि. १५ ऑगस्ट

 

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बडूर ग्रामपंचायतीत यंदाचा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मात्र यंदाचा कार्यक्रम एका आगळ्यावेगळ्या निर्णयामुळे विशेष चर्चेत आला आहे.

 

भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जवान अजय व्यंकटी तुंगलवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले.

 

विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ. चेतना मोहन जाधव यांनी ध्वजारोहणाचा मान स्वतःकडे न ठेवता, देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकाला दिला. त्यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

 

एका दिवसाच्या ध्वजारोहणाचा मान मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी पद, प्रतिष्ठा आणि मान-सन्मानाची चढाओढ पाहायला मिळते. मात्र बडूरच्या महिला सरपंचांनी पदापेक्षा देशसेवा मोठी असल्याचा संदेश आपल्या कृतीतून दिला.

 

इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद शाळा बडूर येथील मुख्याध्यापकांनीही मनाचा मोठेपणा दाखवत सैनिकाला योग्य तो सन्मान दिला. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा केवळ ध्वजारोहणाचा कार्यक्रम न राहता सैनिक सन्मान आणि देशभक्तीचा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

 

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले. यावेळी जवान अजय व्यंकटी तुंगलवार यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

 

या कार्यक्रमाला उपसरपंच जगन्नाथ गुजरवाड, शोभाताई गुजरवाड, पिराजी दावलेकर, गंगाधर तुंगलवार,व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील हनुमंतराव पाटील, वसंतराव पाटील जाधव, मोहन पाटील जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जयप्रकाश गोणशेटवाड, शिक्षक, विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचाही ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.स्पर्धा परिक्षेतिल बडुर गावातील सर्व युवक अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा पास करणारा लक्ष्मण मल्लु गोणशेटवाड यांच्या सह श्री.संगमेश्वर विद्यालय चे 10 वि उत्तीर्ण झालेले कु. डुमणे सोनाली प्रकाश हिने ८७.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, आसमोड स्वाती बाबाराव हिने ८७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर सूर्यवंशी चंद्रभागा चंद्रकांत हिने ८६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

 

या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 

यावेळी सरपंच सौ. चेतना मोहन जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना युवकांनी सैनिकांकडून देशसेवा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

 

देशाच्या सीमेवर सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करतो. त्यामुळे त्याच सैनिकाच्या हस्ते तिरंगा फडकवून त्याला सन्मान देणे, हा केवळ एक कार्यक्रम नसून देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक जवानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आदर्श आहे.

 

बडूर गावातील महिला सरपंच आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतलेल्या या निर्णयातून ‘पदापेक्षा देशसेवा मोठी आणि मानापेक्षा सैनिकाचा सन्मान मोठा’ हा संदेश समाजासमोर आला आहे.

 

एकूणच, देशभक्ती, सैनिक सन्मान आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अशा तिहेरी संगमातून बडूरचा यंदाचा स्वातंत्र्यदिन अविस्मरणीय ठरला. जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोणशेटवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *