कळमेश्वरमध्ये देशभक्तीच्या जल्लोषात भव्य तिरंगा बाईक रॅली*

*कळमेश्वरमध्ये देशभक्तीच्या जल्लोषात भव्य तिरंगा बाईक रॅली*

 

*शेतकरी माझा दैवत; एमआयडीसीसाठी जाणाऱ्या जमिनीला योग्य मोबदलामिळवून देणार*

 

 

*सावनेर-कळमेश्वरमध्ये उद्योगांच्या माध्यमातून झेन झी पिढीसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणार*

 

कळमेश्वर, दि. १४ ऑगस्ट २०२६ : ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकारातून कळमेश्वर येथे शुक्रवारी भव्य **‘तिरंगा बाईक रॅली’**चे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा घेऊन, भारतमातेच्या जयघोषात सहभागी झालेल्या नागरिकांमुळे संपूर्ण कळमेश्वर शहरात देशभक्तीचा उत्साह संचारला होता.

‘चला… तिरंगा हातात घेऊया, राष्ट्रप्रेमाची एकजूट दाखवूया!’ या संदेशाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवक, युवती, शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले.

यावेळी आमदार डॉ. आशिषराव देशमुख म्हणाले, “तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नसून तो स्वातंत्र्य, त्याग, एकता आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित आणि जगात अग्रस्थानी असलेला देश बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने निष्ठेने व कर्तव्यभावनेने काम केले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम भारत आणि उज्ज्वल भारताच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जाण्याची गरज आहे.”

झेन झी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सावनेर-कळमेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्याचा आपला संकल्प आहे, असे सांगताना ते म्हणाले, “कळमेश्वर तालुक्यातील लिंगा परिसरातील कोलगॅसिफिकेशनचा प्रस्तावित मोठा प्रकल्प, सावनेर तालुक्यातील सुमारे ६,४०० एकर क्षेत्रातील मोठी एमआयडीसी तसेच खत प्रकल्पांसारख्या उद्योगांच्या माध्यमातून या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. युवकांना चांगले शिक्षण आणि स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, यासाठी दिवस-रात्र प्रयत्न सुरू आहेत. उद्योग आले तर रोजगार निर्माण होईल आणि प्रत्येक कुटुंबाची आर्थिक समृद्धी वाढेल.”

यावेळी एमआयडीसीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार देशमुख यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “शेतकरी हा माझा दैवत आहे. सावनेर-कळमेश्वर परिसरातील नऊ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीसाठी घेतल्या जात असतील, तर त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य आणि जास्तीत जास्त मोबदला मिळालाच पाहिजे. बाजारभावापेक्षा योग्य व समाधानकारक मोबदला मिळवून देण्यासाठी शासनाकडे ठामपणे पाठपुरावा करू. शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन जमिनीचा दर निश्चित करताना शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा जास्तीत जास्त योग्य दर निश्चित करावा, अशी मागणीही त्यांनी केली. “शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर त्यांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्यासही आपण मागे हटणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

रॅलीदरम्यान ‘जय हिंद! जय भारत!’, ‘भारत माता की जय!’ अशा घोषणांनी कळमेश्वरचा परिसर दुमदुमून गेला. तिरंग्याच्या सन्मानार्थ आयोजित या रॅलीतून स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकता, राष्ट्राभिमान आणि विकसित भारताचा संकल्प नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

याप्रसंगी आमदार डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, प्रिया मानकर, मीना तायवाडे, नितीन गेडाम यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी, सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या आयोजनातून झालेल्या या तिरंगा बाईक रॅलीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कळमेश्वरमध्ये देशभक्तीचा उत्साह निर्माण करत ‘राष्ट्र प्रथम आणि विकासासाठी एकजूट’ असा संदेश दिला.

 

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *