कर्तव्यावर असताना तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

कर्तव्यावर असताना तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

 

* कारवाईत १३ जणांकडून एकूण २६०० रुपयांचा दंड वसूल

 

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

हिंगोली दि. २५ : कर्तव्यावर असताना तंबाखू व गुटखा सेवन करणाऱ्या शासकीय कर्मचारी व इतर व्यक्तींविरुद्ध जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १३ जणांकडून एकूण २६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार, अधिष्ठाता चक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे यांच्या सहकार्याने आज जिल्हा परिषद येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ही कारवाई करण्यात आली. कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणे किंवा ते बाळगणे यामुळे कोटपा-२००३ कायद्याच्या कलम ४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर दंड ठोठावण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यापूर्वीच शासकीय कार्यालय परिसर व शाळांच्या आवारातील पानटपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून, जिल्हाभरात अशी कारवाई पुढेही सुरू राहणार आहे.

ही कारवाई जिल्हा सल्लागार डॉ. किरण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ) व आनंद साळवे (सोशल वर्कर) आदींचा सहभाग होता.

कोटपा कायदा २००३ अंतर्गत प्रमुख तरतुदी :

कलम ४ : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे.

कलम ५ : तंबाखूयुक्त पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीस बंदी आहे.

कलम ६ (अ) : १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखू विक्री करणे किंवा त्यांच्याकडून विक्री करून घेणे दंडनीय गुन्हा आहे.

कलम ६ (ब) : शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्रीस बंदी आहे.

कलम ७, ८, ९ : तंबाखू उत्पादने पॅकेटवर ८५ टक्के भागावर वैधानिक इशारा आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *